कोल्हापूर : पाच वर्षांपूर्वी दिनांक 23 फेब्रुवारी 2018 रोजी कोल्हापुरातील गडिंग्लज तालुक्यातील सांबरे या गावात राहणाऱ्या कल्लप्पा उर्फ परशुराम लक्ष्मण गुरव आणि त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांचा सुखाचा संसार सुरू होता. मात्र याच दिवशी हे दांपत्य गाडीवरून जात असताना अवघ्या पाच ग्रॅम मंगळसूत्रासाठी दोन भुरट्या चोरांनी त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. नारायण पाटील आणि अनिल मानगूतकर अशा या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोन्ही चोरट्यांनी 12 हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरून नेले.
दांपत्याने डोळे गमावले :सदर दापत्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र यामध्ये दोघांनीही आपले डोळे गमवाले. यानंतर गावकऱ्यांनी या दांपत्याच्या पाठीशी खंबीर साथ देत प्रशासनाला जाग आणली. या भुरट्या चोरांना पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले. पोलिसांनी या दोन्ही चोरांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर खटला सुरू झाला. दरम्यानच्या काळात दोघांना जामीन देखील मिळाले. यातील आरोपी अनिल हा फरार झाला होता. तो आज देखील अखेर फरार आहे. मात्र त्याचा साथीदार नारायण याला 22 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अनिलचा शोध सुरू आहे. न्यायालयाच्या माध्यमातून या दांपत्याला न्याय मिळाला असला तरी या घटनेत गुरव दांपत्याने आपले डोळे गमावले. जेव्हा यांच्यावर ऍसिडचा हल्ला झाला. त्यावेळी पासून त्यांच्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी तब्बल साडेतीन लाखाहून अधिकचा खर्च आला आहे. हा सर्व खर्च ग्रामस्थांनी दिलेल्या मदतीतून आणि शेती गहाण ठेवून त्यांनी उपचार घेतला.