कोल्हापूर : सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलं मोबाईल लॅपटॉपच्या दुनियेत प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळण्याचा संबंध खूपच कमी झाला आहे. मैदानी खेळ मोबाईलमध्ये आल्याने लहान मुले दिवस दिवसभर मोबाईल हातातून सोडत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत नाही. हीच बाब लक्षात घेता चिखलात हात घालायचं म्हटलं किंवा अंगाला चिखल लागला तरी अलीकडे नको नको वाटतं; मात्र त्यामुळे पावसाळ्यातील खेळ मागे पडत चालले आहेत. हाच धागा पकडत उत्तूर विद्यालयाने चिखल महोत्सव घेतला. यात खो-खो, कबड्डी यासारखे खेळ खेळण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराला व्यायाम तर मिळालाच; मात्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुललेला आनंद हा गगनात न सामवणारा होता.
Kolhapur Mud Festival 2023: कोल्हापुरात चिखल महोत्सव; 250 विद्यार्थ्यांनी लुटला चिखलात खेळण्याचा आनंद - Kolhapur Mud Festival 2023
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील उत्तुर विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी आज चिखल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हायस्कूलच्या समोरचं असलेल्या मैदानात हा महोत्सव पार पडला. यामध्ये साधारण 250 विद्यार्थ्यांनी चिखलात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
चिखल महोत्सवाचे आयोजन :चिखल महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य शैलेंद्र आमणगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी चिखल महोत्सवाबाबत बोलताना आपल्या मातीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चिखलामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी संगीत आणि हलगीच्या तालावर चिखलात नृत्य केले. त्याचप्रमाणे रस्सीखेच, फुटबॉल यासारखे खेळही खेळण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही चिखलात खेळण्याचा आनंद लुटला.
या कारणामुळे घेतला जातो चिखल महोत्सव :सध्याचा दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी बाहेर पडण्याऐवजी मोबाईलवर गेम खेळत असतात. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक खेळांचा विसर पडत चालला आहे. शिवाय एका ठिकाणी बसून मोबाईलवर गेम खेळल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य देखील व्यवस्थित राहत नाही. आपल्या शाळेतील विद्यार्थी बाहेर पडावेत, त्यांना आपल्या पारंपरिक खेळांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी पावसाळ्यात उत्तूर विद्यालयात चिखल महोत्सव साजरा करण्यात येतो. शाळेसमोरील मैदानात चिखल तयार करण्यात येतो. मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या चिखलाचे मैदान तयार केले जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आवडणारा खेळ ते हवा तेवढा वेळ खेळत राहतात. डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण चिखलाने माखलेले असल्याने विद्यार्थी एकमेकांना न ओळखताही खेळात दंग होतात. शिवाय शरीराचा व्यायाम देखील होतो.