भोकरदन (जालना) - तालुक्यातील इब्राहिमपूर येथील एका तरुणीचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोकरदन शहरापासून चार किलोमीटर अंतर असलेल्या इब्राहिमपूर येथील शेतात डोभाळ कुटुंब राहते. त्यांची मुलगी पूजा सिधुसिंग डोभाळ (वय २०) ही बीडीएसच्या द्वितीय वर्षात औरंगाबाद येथे शिकत होती. टाळेबंदीनंतर ती घरीच होती. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शेत तलावावर गेली होती. तलावावरून चालत असताना पूजाचा पाय घसरला आणि ती शेततळ्यात पडली.
सोबतच्या महिलेने आरडाओरडा केला, मात्र या ठिकाणी कोणी पुरुष नव्हते. त्यामुळे पूजाचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी धावपळ करून तिला गळ टाकून पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत पूजाचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी दाखल होऊन पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजा ही भोकरदन येथील उद्योजक महादुसिंग डोभाळ यांची पुतणी होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.