जालना- वारकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आत्तापर्यंत अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, या सर्व प्रकाराला विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा होता. एवढेच नव्हे तर उद्योगमंत्री देसाईदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे हे सत्तेत येताच त्यांना वारकऱ्यांचा विसर पडला आहे, असा आरोप वारकरी प्रबोधन सेवा मंडळाने केला आहे.
या मंडळाच्या वतीने आज जालन्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच 15 नोव्हेंबरपर्यंत वारकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 18 नोव्हेंबरपासून श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणीच्या घाटावर वारकरी बेमुदत उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मिक गुरुकुलममध्ये शिकविणाऱ्या प्राध्यापकाला दहा हजार रुपये मासिक अनुदान द्यावे. प्रत्येक गावामध्ये बालसंस्कार अध्यात्मिक केंद्र निर्माण करावे, महाराष्ट्रातील प्रत्येक दिंडी मालकासाठी वार्षिक एक लाख मानधन देण्यात यावे, गो-शाळेतील जनावरांची संख्या फक्त 25 करून त्या गो-शाळेला अनुदान देण्यात यावे, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यांमध्ये वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारावे, प्रबोधनकारांना टोल फ्री प्रवास करण्यासाठी पास देण्यात यावेत. जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचे मानधन देण्याची संख्या शंभर एवढी मर्यादीत आहे, ती वाढवून 300 करावी. आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.