महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोराची शक्कल! दागिने टाकले दानपेटीत; तब्बल ३ महिन्यानंतर सीसीटीव्हीमुळे लागला शोध - दानपेटी

जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरू गणेशलालजी महाराज मंदिरामध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या चोरीत एका महिलेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेने परराज्यातील महिलेची चोरलेली पर्स दानपेटीत टाकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गुरू गणेशलालजी महाराज मंदिरामध्ये चोरी

By

Published : Apr 14, 2019, 11:15 PM IST

जालना- शहरात जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरू गणेशलालजी महाराज मंदिरामध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या चोरीत एका महिलेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेने परराज्यातील महिलेची चोरलेली पर्स दानपेटीत टाकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी ज्या गाडीत ही महिला बसून गेली, ती गाडीही जप्त केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराशी व्यापाऱ्यांचे कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंदिरातील चोरीबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी


कर्नाटकातील मल्लेश्वरम (बंगळूर )येथील भाविक मंजुदेवी सिंघवी या जानेवारी २०१९ मध्ये जालन्यात असलेल्या गुरू गणेशलालजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी सहकुटुंब आल्या होत्या. त्यावेळी समाधीचे दर्शन घेत असताना त्यांनी बाजूला ठेवलेली पर्स चोरी गेली. या पर्समध्ये ७० ग्रॅम सोने आणि १० हजार रुपये रोख रक्कम होती. याप्रकरणी मंजू देवी सिंघवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


मागील ३ महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मंजूदेवी सिंघवी यांच्या बाजूला असलेल्या एका भाविक महिलेने त्यांची पर्स पळवून दान पेटीत टाकल्याचे दिसून आले. या पुराव्यावरून सदर बाजार पोलिसांनी संस्थांच्या विश्वस्तांना दानपेटी उघडण्याची विनंती केली. त्यामध्ये चोरीला गेलेली पर्स सापडली. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास करत असताना सदरील पर्स चोरणारी महिला ज्या गाडीत बसून गेली ती गाडी पोलिसांनी जप्त केली. ही सदरील गाडी (एम. एच. २१ एएक्स १२२२) जालन्यातील राजेश धोका या इसमाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, गाडीचे मालक आणि ही महिला एकाच समाजाचे असल्यामुळे व्यापाऱ्यांशी या महिलेचे काही कनेक्शन आहे का? याचा तपासही पोलीस घेत आहेत. अद्याप गाडी मालकाला किंवा आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध कानाकोपऱ्यांतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या समाधीस्थळी येणाऱ्या विशेष करून जैन समाजातील व्यापाऱ्यांमध्ये या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details