जालना - राज्यातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जुन्या जालन्यातील गांधीचमन परिसरात शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकार सामान्य माणसांचा खिसा कापत आहे -
आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, केंद्राच्या निर्णयामुळे सामान्य माणूस संकटात सापडला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकार सामान्य माणसांचा खिसा कापत आहे. कच्च्या तेलाच्या भावात फार तफावत नसताना देखील जनतेवर अधिभार टाकणे अन्यायकारक असल्याचे खोतकर म्हणाले.
गॅसच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन हम करे सो कायदा -
मोदी सरकारने हम करे सो कायदा, अशा पद्धतीने राज्य करणे सुरू केले आहे. शेतकरी, सामान्य माणूस मरत असेल तर मरू द्या, अशी भावना मोदी सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गादीवर बसण्यापूर्वी पेट्रोल पन्नास रुपये होते ते आता शंभर रुपये लिटर झाले आहे. नतर गॅस तीनशे रुपये प्रतिसिलिंडर होता तो आता सातशे रुपये झाला आहे. त्यामुळे ही महागाई सामान्य माणसांना परवडणारी नाही. म्हणून शिवसेना आता रस्त्यावर उतरून राज्यभरात राज्यव्यापी आंदोलन करत आहे. आजच्या या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी ,विजय पवार ,बाबुराव पवार, महिला आघाडी प्रमुख सविता कीवनडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.