महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावकाराकडून तहसीलदार अन् पोलीस निरीक्षकाने दोन-दोन लाखांची लाच घेतली, पीडित शेतकऱ्याचा आरोप - जालना गुन्हे वृत्त

अवैध सावकारीआधारे जमीन हडप केल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या समोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्याचे तहसीलदार व शेवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी सावकाराकडून दोन-दोन लाखाची लाच घेतल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

alleges the victim farmer
पीडित शेतकऱ्याचा आरोप

By

Published : Oct 6, 2020, 8:08 PM IST

जालना - पालकमंत्र्यांसमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर सध्या शासकीय रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि शेवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी प्रत्येकी दोन- दोन लाखांची लाच सावकाराकडून घेतली असल्याचा गंभीर आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी विलास राठोड यांनी केला आहे. राठोड या शेतकऱ्याने 5 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे यांची आढावा बैठक सुरू असताना विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पीडित शेतकऱ्याचा तहलीसदार व पोलीस निरीक्षकावर लाच घेतल्याचा आरोप

विलास राठोड या शेतकऱ्याची ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने रुग्णालयात जाऊन त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे आरोप केले. दरम्यान दुसरीकडे पाथरूड येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना अवैध सावकारीआधारे जमीन हडप करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. निवेदन देण्यासाठी रिपब्लिकन सेनेने देखील पाठिंबा दिला असून कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अशा प्रकारची लाच घेऊन अनेक फेरफार होत असल्याची तक्रार रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच जालना तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांचा निषेध करून त्यांच्या बदलीची मागणीही करण्यात आली आहे. आज या निवेदनात रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्यासह रोहिदास गंगातिवरे, गुलाब राठोड, सिताराम रामचंद्र राठोड, अविनाश राठोड, दिलीप चव्हाण, शिवराम आडे, नागेश चव्हाण, मधुकर राठोड आदि गावकरी उपस्थित होते.

दरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यासंदर्भात आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांवर बैठकांचा सपाटा सुरू होता. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सेवली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास काढून घेऊन मौजपुरी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे आणि पुढील सात दिवसात या प्रकाराचा अहवाल मागविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details