जालना - जिल्ह्यात 2004 पासून सुरू असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 30 नोव्हेंबर रोजी बंद पडला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे विद्यावेतन न मिळाल्यामुळे आता पालक हैराण झाले आहेत. या पालकांचा ससेमिरा केंद्रचालकाकडे असल्यामुळे शिक्षक त्रासले आहेत.
हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी शिक्षकांकडून वेळोवेळी सर्वे करून बालकामगार म्हणून काम करत असलेल्या मुलांना वीटभट्ट्या, पंचरची दुकाने, हॉटेल आदी ठिकाणाहून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दरमहा या विद्यार्थ्यांना ४०० रुपये विद्यावेतन जाहीर केले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या हजेरी पटावरून त्यांना दरमहा 400 रुपये मिळणे अपेक्षित होते.
सर्वे केल्यानंतर या राष्ट्रीय बालकामगारांना या प्रकल्पाच्या शाळेत आणल्यानंतर त्यांची वेळोवेळी हजेरी घेऊन त्यांना दरमहा ४०० रुपये दिले जात असल्याचे प्रकल्प संचालकांनी सांगितले आहे. मात्र, ३० तारखेला हा प्रकल्प बंद झाला आणि सर्वत्र या प्रकल्पाचा अनागोंदी कारभार बाहेर यायला लागला. जाफराबाद येथील या प्रकल्पाच्या शाळेतील बालकामगारांना विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नावावर उचलले जाणारे विद्यावेतन गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालकांनी केंद्र चालकाच्या मागे विद्यावेतनासाठी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. केंद्रचालक बँक खात्यात पैसे जमा झाले असल्याचे सांगत त्यांना त्यांना बँकेत पाठवत आहेत. परंतु, संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत. उलट बँक व्यवस्थापक खात्यावर किमान १०० रुपये तरी जमा करा असे ते म्हणताहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पैसे कुणी हडप केले? असा संतप्त सवाल या बालकामगारांचे पालक करीत आहेत.