जालना - कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवरील वरूडी येथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करूनच वाहन सोडण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन व जिल्हा बंदी करण्यात करण्यात आलेली होती. प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद-जालना मार्गावरील वरूडी येथे चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. या चेकपोस्टवर औरंगाबादकडे जाणारी वाहने औरंगाबाद पोलिसांकडून तपासण्यात येत आहे तर जालनाकडे जाणारी वाहने जालना पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने अनलॉक सुरू करण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. मात्र, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जालना व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यात मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे जालना जिल्ह्यात ५ जूनपासून तर औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक १० जूनपासून कडक संचारबंदीची आदेश देण्यात आले. या काळात जिल्ह्यात येण्यासाठी व जाण्यासाठी देण्यात येत असलेल्या पासेसही बंद करण्यात आलेल्या असून वैद्यकीय कारणाशिवाय कोणत्याही वाहनाला परवाना देण्यात येत नाही आहे.