जालना - विदेशात पिकणाऱ्या फळांची मागणी आता देशभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका या देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या अनेक फळांची मागणी भारतातही होऊ लागली आहे.विविध प्रकारच्या फळांच्या आणि भाज्यांच्या लागवडीचे प्रयोग राज्यातील शेतकरी करत असतात. अशाच प्रकारे पारंपरिक शेतीला फाटा देत जालना जिल्ह्यातील शेतकरी परिवाराने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड केली आहे. शेतकरी एकनाथ बन्सीधर मुळे यांनी वडिलांच्या पारंपरिक शेती विचारांमध्ये बदल घडवत एक एकरमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली होती.
ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड कसे घेतले उत्पादन?
वार्षिक 20 हजार रुपयांच्या खर्चामध्ये सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव परिसरात हे शेत आहे आणि हे दोघे पिता-पुत्र ही शेती करत आहेत. व्यवसायाने शिक्षक असलेले एकनाथ मुळे यांनी शिक्षणाच्या प्रवाहात असल्यामुळे अत्याधुनिक विचारांची कास धरली आहे. 2016मध्ये ड्रॅगन फ्रुटची निवड करून त्यांनी कोणत्या फळाला बाजारपेठेत मागणी आहे याबद्दल माहिती घेतली आणि पश्चिम बंगालमधून लाल रंगाच्या फळाची 52 रुपयांना एक याप्रमाणे रोपे खरेदी केली.
इतर शेतकऱ्यांना आवाहन..
पहिल्या वर्षी दोन टन मालाचे उत्पादन घेत दोनशे रुपये किलो याप्रमाणे चार लाखांचे उत्पन्न मिळवले. आता या फळाचे उत्पादन चार टन अपेक्षित असून या चार टनमध्ये ते सात ते आठ लाखांचे उत्पन्न होईल, अशी माहिती एकनाथ मुळे यांनी दिली. या शेतीवर देखभाल दुरुस्तीचा खर्च केवळ वर्षाला वीस हजार रुपये येत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत कमी पावसामध्ये, कमी खर्चामध्ये चांगला नफा मिळणाऱ्या या ड्रॅगन फ्रुटकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.