जालना- वरिष्ठ पातळीवर जरी शिवसेना भाजपची युती झाली असली तरीही, स्थानिक पातळीवर मात्र, भाजप शिवसेनेला आपल्या सोबत घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसत आहे. मात्र, आता निर्णय झाल्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेलाही सोबत घ्यावे आणि आमचा ही नारा देत जावा, अशी कनाउघडणी सेनेने भाजपाच्याच व्यासपीठावर केली आहे.
केंद्र शासनाच्या जनआरोग्य योजनेच्या कार्ड वाटपाचा कार्यक्रम जालना विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शहरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर येणार होते. मात्र, ते न आल्याने व्यासपीठावर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा अर्जुन खोतकर यांचे चुलत बंधू अनिरुद्ध खोतकर यांची उपस्थिती होती.
सभा सुरू झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त भाजपच्याच संदर्भातच घोषणाबाजी सुरू केली. तसेच भाजपानेच काय काय केले याचे दावे हे जनतेसमोर मांडू लागले. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भाजपाची कानउघडणी केली. आम्ही सोबत नाहीत असे गृहीत धरूनच तुम्ही घोषणाबाजी सुरू केली आहे, त्यामध्ये आता सुधारणा करा. आम्हीही तुमच्यासोबत आहोत हे लक्षात ठेवा! त्यामुळे भाजप शिवसेनेचा विजय असो म्हणायची सवय लावा, अशी कानउघडणी केली.
आम्ही देखील चांगल्या निर्णयांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबत होतो. हे विसरू नका! असे आंबेकर म्हणाले. परंतु, एकीकडे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये विस्तव आडवा जात नसताना दुसरीकडे मात्र, शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर येत आहेत. चार दिवसांपूर्वीच ईटीव्ही भारतने शुक्रवारच्या कार्यक्रमासंदर्भात वृत्त दिले होते. त्यामध्ये आजच्या वातावरणावरून रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना व्यासपीठावर बोलावून नमविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आज ते न आल्यामुळे दोघांमध्ये "काटे की टक्कर" होण्याची शक्यता आहे.
कार्यकर्ते संभ्रमात -
जालना बाजार समितीमध्ये सभापतीपदी नामदार खोतकर हे विराजमान आहेत. तर उपसभापती म्हणून खासदार दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे कारभार पाहत आहेत. त्यामुळे मार्केट कमिटीने देखील आपण खासदाराच्या बाजूने उभे राहावे का सभापती खोतकर यांच्या बाजूने उभे राहावे? या संभ्रमात व्यापारी आहेत. या दोघांमधील लढण्याची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे इकडे "आड तिकडे विहीर" अशी परिस्थिती मतदारांची आणि कार्यकर्त्यांची झाली आहे.