जालना- शहरात मंगळवारी सर्वपक्षीय शिवजयंती उत्सवाला संध्याकाळी ५ वाजता सुरुवात झाली. मात्र, या उत्सवावर पुलवामा हल्ल्याचे सावट जाणवत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवप्रतिमेचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.
शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्यावतीने १९५६ पासून सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात येते. या समितीच्या माध्यमातून दरवर्षी तारखेनुसार शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात येते. यावेळीही जुना जालन्यातील गांधीचमन येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे हार, तुरे, स्वागत समारंभाला फाटा देऊन मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी साध्या पद्धतीने लेझीम, ढोल पथक, यांच्या सहाय्याने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.