जालना - जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रेम मसीह यांनी आपला विनयभंग केला. अशी तक्रार डॉक्टर फेजर बॉईज प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने बाजार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकारामुळे संस्थेच्या इतर शाळांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही शाळा आज अचानक बंद ठेवल्यामुळे पालकही चिंतित झाले. दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी शाळेसमोर जमल्यानंतर मुख्याध्यापक एम. एन. लोंढे यांनी ही शाळा पुन्हा उघडली.
सचिवाने विनयभंग केल्याची शिक्षिकेची तक्रार, डॉक्टर फेजर बॉईज प्राथमिक शाळेतील प्रकार जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या शहरामध्ये अनेक शाळा आहेत. त्यातीलच डॉक्टर फेजर बॉईज प्रायमरी हायस्कूल ही एक आहे. या शाळेतील शिक्षिकेने एका बँकेचे कर्ज घेतले होते. बँकेच्या कर्ज वसूली संदर्भात कार्यवाही देखील सुरू होती. या वसुलीसाठी संबंधित बँकेचे अधिकारी डॉक्टर ख्रिस्तोफर मोजस यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्याच वेळी या संस्थेचे सचिव प्रेम मसीह (रा.ओमेगा बिल्डिंग, ग्रँट रोड मुंबई) हे देखील त्यावेळी उपस्थित होते.
यावेळी तक्रारदार शिक्षिकेला स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम. यु. कसाब यांनी फोन करून ख्रिस्तोफर मोजस यांच्या बंगल्यावर बोलावले. चार वाजेच्या सुमारास शिक्षिका बंगल्यावर पोहोचल्यानंतर सचिव प्रेम मसीह यांनी शिक्षिकेला अपमानास्पद वागणूक दिली. त्या एका खोलीमध्ये पत्र लिहीत असताना त्यांच्यासोबत असभ्य वर्तणूक केली आणि विनयभंग केला. अशा आशयाची तक्रार सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या महिला शिक्षिकेने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज (बुधवार) नेहमीप्रमाणे सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शाळा बंद करण्यात आली. अचानक बंद झालेल्या शाळेमुळे विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेले. शाळेची बाजू ऐकून घेण्यासाठी मुख्याध्यापक एम. एन. लोंढे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.