जालना -राज्याला मोठा महसूल मिळवून देणारे कार्यालय म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाहिले जाते. कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढल्यानंतर 19 एप्रिल पासून जालना जिल्ह्यात तीन वेळा लोकडाऊन करण्यात आले. त्यामुळे हे कार्यालय जरी सुरू असले तरी नागरिकांना येथे येण्यासाठी अनेक समस्या आल्या आहेत. असे असले तरीही सुमारे साडेतीनशे नागरिकांनी ऑनलाईन सिस्टीमचा उपयोग घेत आपले परवाने नूतनीकरण करून घेतले आहेत. तर सुमारे चारशे प्रशिक्षणार्थी उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. या उमेदवारांना आता दर दिवशी आठ उमेदवार अशा पद्धतीने परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनामुळे या परिसरात एजंट म्हणून काम करणाऱ्या पंचवीस एजंटांना याचा फटका बसला आहे. लोकडॉऊन पूर्वी त्यांनी परवाने नूतनीकरण, वाहनांचे नामांतर अशा पद्धतीची कामे घेतली होती. मात्र, ते या कार्यालयात न येऊ शकल्यामुळे त्याची मुदत संपली आणि संबंधित नागरिक हे ऐकण्यासाठी तयार नाहीत. पर्यायाने अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या वाहनाचे मालक समोर नसल्यामुळे या वाहनांची नोटरी करून आणावी लागत आहे आणि याचा भुर्दंड या एजंटांना भरावा लागत आहे. तीन महिन्यापासून हाताला काम नव्हते आणि हातावर जे काम आहे त्यामधून उत्पन्न तर सोडाच खिशातून पैसे भरून ही कामे पूर्ण करावी लागत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. एक एप्रिल ते 30 जून यादरम्यान या कार्यालयाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 एप्रिल ते 30 जून दरम्यान 11 कोटी 84 लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात सर्वसामान्याला माहीत असलेले आरटीओ कार्यालय. या कार्यालयातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. वाहन खरेदी- विक्री, नामांतर, परवाना फी, वाहन नोंदणी फी, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून या कार्यालयात उलाढाल होते. त्यामुळे लाखो नव्हे तो करोडो रुपयांचे उत्पन्न या कार्यालयातून सरकारला मिळत आहे. मात्र, एप्रिल मे जून 2019 च्या तुलनेत चालू वर्षी हे उत्पन्न 11 कोटी 84 लाख रुपयांनी घटले असल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये या तीन महिन्यांमध्ये 13 कोटी 92 लाख रुपये उत्पन्न झाले होते तर यावर्षी याच तीन महिन्यांमध्ये फक्त दोन कोटी 78 लाख एवढेच उत्पन्न झाले आहे. या उत्पन्ना सोबतच वाहन खरेदी देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे.
ऑनलाईन नुतनीकरण
ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी एप्रिल ते जूनच्या दरम्यान चारशे उमेदवारांनी अर्ज भरले होते. या सर्वांना आता एसएमएस पाठवून परीक्षेसाठी बोलावून घेतले जाणार आहे. तर साडेतीनशे वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे परवाने ऑनलाईन पद्धतीने नुतनीकरण करून घेतले आहेत.