जालना - भारतातील एकमेव मंदिर असलेल्या सावरगाव (तालुका परतुर) येथील श्री चतुर्वेदेश्वर धाम मंदिरात सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत. त्यानिमित्त वेद पुरुष महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या मूर्तीची राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी तथा पूर्वाश्रमीचे किशोर व्यास यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी प्रज्ञाचक्षू मुकुंद जाट देवळेकर यांच्यासह अनेक विभूती आणि देशातील विविध राज्यातील वेदशास्त्र पुरोहित उपस्थित आहेत.
सुवर्ण महोत्सवानिमित्त चतुर्वेदेश्वर धाम मंदिरात धार्मिक कार्यक्रम
भारतामध्ये चारही वेदांचा मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे. गोदाकाठी असलेल्या या मंदिरात सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, या चारही वेदांच्या मूर्त्या आहेत. १९६९ साली सुरू झालेले हे वेद विद्यालय आजही गुरुकुल पद्धतीने वेदशास्त्रसंपन्न विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे.
लोप पावत चाललेले वेदांचे अध्ययन लक्षात घेऊन गोदा परिक्रमा करता करता श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी १९६९ मध्ये या गोदाकाठी श्री चतुर्वेदेईश्वराची प्राणप्रतिष्ठा केली. साखरखेर्डा (जिल्हा बुलढाणा) येथील परमपूज्य प्रल्हाद महाराज यांच्याहस्ते या श्रींची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये चारही वेदांचा मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे. गोदाकाठी असलेल्या या मंदिरात सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, या चारही वेदांच्या मूर्त्या आहेत. १९६९ साली सुरू झालेले हे वेद विद्यालय आजही गुरुकुल पद्धतीने वेदशास्त्रसंपन्न विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे. निसर्गरम्य वातावरणात उपनयन संस्कार झाल्यानंतर शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थी येथे वेद अध्ययनाचे धडे गिरवतात. लोप पावत चाललेली आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले वेद संस्कृती ही आज टिकून आहेच शिवाय पुनरुज्जीवित झाली आहे. इथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी आपल्या ज्ञानाची भूक पूर्ण करण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन ज्ञानामध्ये भर टाकत आहे.
२० फेब्रुवारीपासून २६ फेब्रुवारीपर्यंत चालू असलेल्या सुवर्णमहोत्सवात राष्ट्रसंत गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविकांसोबतच परगांवाहून आलेले सदगुरू देखील येथे ध्यानस्त बसले आहेत. दिंड्यांमध्ये ज्याप्रमाणे राहुट्या उभ्या करून वार्याची व्यवस्था केली जाते. त्याच पद्धतीने चतुर्वेदेईश्वर धामच्या प्रांगणावर राहुट्या, यज्ञमंडप, भागवत मंडप, सभामंडप, अशा विविध प्रकारच्या मंडपने हा परिसर फुलून गेला आहे. परमपूज्य कस्तुरे बाबा यांना वेद पुरुष, महामहोपाध्याय, अशा अनेक पदव्यांनी सन्मानित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तत्कालीन राष्ट्रपतींनी देखील त्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती भवनात निमंत्रित केले होते. मात्र वेदाध्ययनात खंड पडेल म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिला. मात्र त्यांनी पाठवलेली प्रमाणपत्रे आजही त्याची साक्ष देत आहेत. स्वतः शंकराचार्यांनी पत्र लिहून बाबांचा सन्मान केला. अशा या चतुर्वेदी ईश्वर धाममध्ये सुवर्ण महोत्सवानिमित्त रोज पहाटे पडणारे सूर्याची किरणे या परिसराला तेजोमय करून टाकत आहेत.