जालना - कोविड-19 या आजाराने त्रस्त असलेल्या जालना जिल्ह्यातील सुमारे सहा हजार रुग्णांपैकी तीन हजार रुग्णांना रेमडिसीविर या इंजेक्शनचा चांगला फायदा झाला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आल्याचे डॉक्टरांनी मान्य केले आहे. जिल्ह्यात सामान्य रुग्णालय आणि अन्य चार खासगी रुग्णालये अशा एकूण पाच रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील 6 हजार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी सुमारे 50 टक्के म्हणजेच तीन हजार रुग्णांवर रेमडिसीविर या इंजेक्शनचा वापर करण्यात आला आहे.
कोविड-19 शासकीय रुग्णालयात मंगळवार (ता. 8) पर्यंत 752 रुग्णांवर याचा वापर करण्यात आला आणि 139 इंजेक्शन या हॉस्पिटलमध्ये शिल्लक आहेत. शहरातील अन्य चार खासगी कोविड-19 रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 2 हजार 800 इंजेक्शन्स आली आहेत. त्यापैकी 2 हजार 200 इंजेक्शनचा वापर झाला आहे. आणि 600 इंजेक्शन या रुग्णालयांमध्ये शिल्लक आहेत. सर्व हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. या इंजेक्शनचा रुग्णांवर चांगला परिणाम झाला असल्याचे शासकीय आणि खासगी डॉक्टरांनी सांगितले आहे.