जालना- पिस्तुलाच्या खरेदी-विक्रीचे शहर केंद्र बनले असल्याचे समोर येत आहे. वर्षभरामध्ये चार-पाच पिस्तूल सापडल्यानंतर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा गावठी पिस्तुलासह एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे.
जालन्यात पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात हेही वाचा -#Encounter न्याय झालाय परंतु, ही पद्धत अन्यायकारक - नवाब मलिक
शहरात अवैध पिस्तुलाची संख्या आणि त्यातून होणारे गुन्हे याच्या तपासासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये सदर बाजार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जालना शहरातच राहणाऱ्या माऊलीनगर येथील अनिरुद्ध मारुती शेळके (वय 25) या तरुणाला अडवले. त्यानंतर त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या पॅन्टमध्ये लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मॅक्झिनसह पोलिसांनी जप्त केले आहे.
या पिस्तुलाची किंमत 25 हजार रुपये असून त्याच्याजवळून मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यासोबत शेळके याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.