जालना - मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव या गावातील अंगणवाडीच्या कुंपणावर 95 हजार 750 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, मात्र तिथे एक रुपयाचे देखील कुंपण बांधले नाही, यासंदर्भात पंचनामा होऊनही संबंधितावर कार्यवाही करण्यात आली नाही. शौचालयासाठी ग्रामस्थांना अनुदान म्हणून आलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न करता ग्रामपंचायतीने स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतली. अनुदानापासून 12 ग्रामस्थांना वंचित ठेवले यासह अन्य गैरप्रकारांची चौकशी करावी. या मागणीसाठी वैद्य वडगावच्या ग्रामस्थांनी जालना जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत ,गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही फक्त चौकशी झाली. मात्र, या चौकशीचे पुढे काय झाले हे अद्यापही तक्रारकर्त्यांना कळविण्यात आले नाही. यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 18 जून रोजी पत्र देऊन यासंदर्भात 7 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, या प्रकरणाला महिना होऊन गेला तरीदेखील हा अहवाल आलेला नाही. या सर्व प्रकाराला वैतागून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामप्रसाद राऊत, संदीप वैद्य ,हरिभाऊ वैद्य, मदन वैद्य, प्रभाकर वैद्य हे पाच जण जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.