जालना - जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जामवाडीच्या नागरिकांना कळशीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेष म्हणजे विहिरीतील पाणी भरण्यासाठी लहान मुलींचा वापर केला जात आहे. या विहिरीवरील लोखंडी कठडे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसे नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
जालन्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर जामवाडी हे गाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा येथे मोठा प्रकल्प आहे. असे असतानाही गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. प्रकल्पाच्या मध्यभागी मोठी विहीर असून या विहिरीत देखील पाणी नाही. परंतु गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते. दोन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर हंडाभर पाणी मिळते. मग गावकरी जसे लागेल तसे पाणी उपसून घरी घेऊन जातात.