जालना- नांदेडकडे जाणारा बिटको ट्रान्सपोर्टचा आयशर ट्रक रस्त्यावर उभ्या असलेला ट्रकला जाऊन धडकला. तर काही काळानंतर याच ट्रकवर कार येऊन धडकली. या तिहेरी अपघातात कारमधील एक जण ठार झाल्याची दुर्घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास जालन्यातील अंबड चौफुली घडली येथे घडली आहे.
जालन्यात तिहेरी अपघातात एक जण ठार सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिकहुन नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकचे (क्र. एम.एच 15 सी.के 1555)अंबड चौफुलीपासून पुढे एक किमी अंतरावर टायर फुटले होते. त्यामुळे चालक रस्त्याच्या बाजूला टायर बदलत होता. याचवेळी औरंगाबाद येथून नांदेडकडे जाणारा बेटको ट्रान्सपोर्टचा आयशर ट्रक क्रमांक एम.एच 20 ई.एल 1265 हा उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. यामध्ये ट्रकच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. सुदैवाने आयशर चालक उत्तम पाटोळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यबरोबर आसपास कोणीही नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
काही काळातच घडला तिसरा अपघात
तिसऱ्या प्रकरणात हे दोन वाहने भिडलेले असतानाच पहाटे पाच वाजेच्या सुमारास कार क्रमांक एम.एच 15 टी.व्ही 1404 ला मागून धडकली. नाशिक येथून सिंदखेड राजा तालुक्यात असलेल्या खैरखेडा कडे ही कार जात होती. यामध्ये किरण संजय धोंडगे (रा. खैरखेडा, ता. सिंदखेड राजा) हे जागीच ठार झाले आहेत. हे वाहन किरण संजय धोंडगे व मंठा तालुक्यातील खाडे यादोघांनी किरायाने घेतले होते. या वाहनाचा चालक गजानन मोरे हा खाडे यांना मंठा येथे सोडून, धोंडगे यांना सोडण्यासाठी खैरखेडा येथे जाणार होता.
कारमधले इतर प्रवासी किरकोळ जखमी
दरम्यान कारमध्ये असलेले विनोद आसाराम खाडे 28, रेशमा विनोद खाडे 26, आयुष विनोद काळे 7, किरकोळ जखमी झाले आहेत. तर अथर्व विनोद खाडे हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील वाहने वेगळी करण्यासाठी आणि जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली आहे.
हेही वाचा -खाजगी बस आणि जीपचा अपघात; एक ठार, 8 जखमी