जालना - दारूचं व्यसन सोडण्याचं औषध दिल्यानं एका जणाचा मृत्यू झाला आहे. ४० वर्षीय गोपाल दवांडे असं या औषधाचं सेवन केल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्याच नाव असून तो अकोला जिल्ह्यातील शिसामासा गावचा रहिवासी आहे. तर दारूचं व्यसन सोडण्यासाठी औषध देणारा भोंदू बाबा हा जालन्यातील धावडा गावचा रहिवासी आहे.
दारू सोडण्याचे औषध दिल्याने एकाचा मृत्यू; औषध देणारा भोंदूबाबा फरार
दारूचं व्यसन सोडण्याचं औषध दिल्यानं एका जणाचा मृत्यू झाला आहे. ४० वर्षीय गोपाल दवांडे असं या औषधाचं सेवन केल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्याच नाव असून तो अकोला जिल्ह्यातील शिसामासा गावचा रहिवासी आहे. तर दारूचं व्यसन सोडण्यासाठी औषध देणारा भोंदू बाबा हा जालन्यातील धावडा गावचा रहिवासी आहे.
भोंदू बाबाने दिलेल्या औषधामुळे मृत्यू झाल्यानं मृताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह औषध भोंदू बाबाच्या घराच्या दरवाज्यात आणून ठेवल्यानं तो फरार झाला आहे. तडवी बाबा असं फरार झालेल्या भोंदूचं नाव आहे. शिसामासा येथील गोपाल दवांडे यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी त्यांना काल जालन्यातील धावडा येथील तडवी बाबाकडे आणण्यात आलं होतं. त्याने दारु सोडवण्यासाठी साडेचार हजार रुपये घेऊन त्यांना दोन ग्लास औषध पाजलं. त्यानंतर गोपाल दवांडे हे बेशुध्द अवस्थेत होते. मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. दरम्यान या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केलीय. या घटनेची माहिती पारध पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.