जालना -अंगणवाडीतील बालकांसाठी निकृष्ट दर्जाची तूर डाळ येते. हा माल उतरवण्यास नकार दिला तर खासदाराची माणसे धमकी देतात, अशी तक्रार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्यांनी अंगणवाडीतील बालकांसाठी आलेली तूर डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ती खाणे योग्य नाही, अशी तक्रार केली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे आणि महिला व बालकल्याण अधिकारी लोंढे यांनी निकृष्ट डाळ उतरवूनच कशाला घेता? असा प्रश्न विचारला. खासदाराची माणसे आम्हाला धमकी देतात. डाळ उतरवून घ्या. वापरायची असेल तर वापरा नाहीतर फेकून द्या. काय करायचे ते करा, नाहीतर तुमचे नाव खासदाराला सांगू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सेविकांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजाने डाळ उतरून घ्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.