जालना -विषारी औषधी घेतल्याने नवविवाहिता पूजा लोणकर (२०) यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे घडली. या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील पूजा हिचा विवाह ९ जून २०२० रोजी तडेगाव येथील पवन संजय लोणकर यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच सासरचे लोक हुंड्यासाठी पूजाचा छळ करू लागले. या छळाला कंटाळून पूजा माहेरी गेली होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वी आता छळ करणार नाही, असे सांगून सासरच्यांनी तिला परत नेले.
मात्र, २७ ऑक्टोबर रोजी पूजाने सासरची मंडळी पुन्हा छळ करत असल्याचे आईला फोन करून सांगितले. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी रात्री तिने विष घेतले. तिला उपचारासाठी आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सासरच्या लोकांनी तिच्यावर सिल्लोड येथे उपचार करू, असे म्हणत डिस्चार्ज घेतला. त्यानंतर तिला माहेरी सोडून तडेगावला गेले.