जालना -नाशिक आणि नगर भागात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पाणीपातळी वाढल्याने 26 जुलैला सकाळी धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन केले आहे.
राजेश टोपेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक -जायकवाडी धरणात प्रचंड पाण्याची आवक येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्णाण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन काय उपाययोजना करत आहे, यासाठी माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी जायकवाडी धरणांच्या अभियंत्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी जायकवाडी धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यातील वाढीविषयी माहिती दिली. जायकवाडी धरणात प्रचंड पाणीसाठा वाढत असल्याने उद्या विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.