जालना- जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जाफराबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना येथे येऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारीचे निवेदन सादर केले.
जाफराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे पत्रकारांना आवश्यक ती माहिती देत नाहीत. त्यामुळे बातमी लिहिताना पत्रकारांना अडचणी येत असून जनतेसमोर खरी बातमी जात नाही. नुकत्याच झालेल्या शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मारहाणीची गंभीर घटना घडल्यानंतरही याबाबतची कोणतीही माहिती पत्रकारांना दिली गेली नाही. उलट ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाय यांच्याकडे आहे, तेच सांगू शकतील असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हा गुन्हा जाफराबाद पोलिस ठाण्यातच दाखल करण्यात आला आहे, असे आरोप निवेदनात करण्यात आले.