जालना- पोटच्या बाळासोबत बारा दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर तान्हुल्याला सोडून आई फरार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. जालना तालुक्यातील वडीवाडी येथील ही 20 वर्षीय महिला जालन्यातील स्त्री रुग्णालयात 12 दिवस या बाळासोबत राहिली आणि 26 तारखेला गायब झाली. तिच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
बारा दिवसांच्या नवजात बालकाला दवाखान्यात सोडून आई फरार; पोलीस घेतायेत शोध - जालना बालकाला दवाखान्यात सोडून आई फरार
जालना तालुक्यातील वडीवाडी येथील ही 20 वर्षीय महिला जालन्यातील स्त्री रुग्णालयात 12 दिवस या बाळासोबत राहिली आणि 26 तारखेला गायब झाली. तिच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.
जालना तालुक्यातील वाडीवाडी येथील रेश्मा इसाक पठाण (वय 20) या महिलेचा दोन वर्षांपूर्वी इसाक पठाण (वय 25) राहणार वडिवाडी यांच्यासोबत विवाह झाला आणि दोन वर्षानंतर 12 एप्रिलला रेश्मा पठाण यांना मुलगा झाला. परतूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी या बाळाला जालना येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. त्यावेळी बाळाचे वजन एक किलो 235 ग्रॅम एवढे होते. त्यामुळे काळजी करण्याचे फारसे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु, रेश्मा पठाण यांचा त्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी बाळाला खासगी रुग्णालयात घेऊन जाऊ नाहीतर फारकत घेते, असे पठाण यांना सांगितले आणि 14 दिवसानंतर दिनांक 26 एप्रिलला रेश्मा पठाण या दवाखान्यातून गायब झाल्या. त्या परत न आल्यामुळे इसाक पठाण यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली आहे.
बाळ सुस्थितीत
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार सध्या बाळ सुस्थितीत आहे. ज्यावेळी ते रुग्णालयात आले होते त्यावेळी त्याचे वजन एक किलो 235 ग्रॅम होते आणि निसर्ग नियमानुसार पुढील दहा दिवसांमध्ये ते कमी होत असते. त्यानुसार आज या बाळाचे वजन एक किलो 110 ग्रॅम आहे. तसेच बाळाचे वजन दीड किलोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे आता या बाळाची काळजी येथील परिचारिकाच्या घेत आहेत. तूर्तास या बाळासोबत त्याची आजी इथे आहे.
पहिलेच मूल
रेश्मा आणि इसाक यांचा विवाह झाल्यानंतर हे पहिलेच मूल आहे आणि 14 दिवस मुलासोबत राहिल्यानंतरही आईला मायेचा पाझर कसा फुटला नाही? याचे आश्चर्य रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांनादेखील वाटत आहे. दरम्यान, आई जरी सोबत नसली तरी जबाबदारी म्हणून या परिचारिका 14 दिवसांच्या या मुलाची आईप्रमाणे काळजी घेत आहेत. पठाण यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस कॉन्स्टेबल राहुल जोंधळे हे या महिलेचा शोध घेत आहेत.