महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात २ हजार ७५७ बालकामगार घेताहेत शिक्षणाचे धडे

वीट भट्टी, चहाचे हॉटेल, पाणीपुरीचे गाडे, झोपडपट्टी आदी ठिकाणी बाल कामगार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा आणि या विद्यार्थ्यांच्या हक्काचे शिक्षण देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जातो.

बालकामगार दिन

By

Published : Jun 12, 2019, 7:09 PM IST

जालना - १२ जून बालकामगार विरोधी दिन असून भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्यावतीने जालना जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प चालविला जात आहे. बालकामगार प्रकल्पाच्या माध्यामातून जिल्ह्यात २ हजार ७५७ विद्यार्थी सध्या शिक्षणाचे धडे घेत आहेत.

बालकामगार दिन

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून जालना शहर व जिल्ह्यामध्ये बाल कामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वीट भट्टी, चहाचे हॉटेल, पाणीपुरीचे गाडे, झोपडपट्टी आदी ठिकाणी बाल कामगार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा आणि या विद्यार्थ्यांच्या हक्काचे शिक्षण देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जातो. तसेच त्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा, शिक्षण घेत असतानाच उदरनिर्वाहाची अडचण येणार नाही याचीही व्यवस्था व्हावी, या हेतूने विद्यार्थ्यांना दरमहा चारशे रुपये विद्यावेतनही दिले जाते. त्यासोबत ज्या शाळेमध्ये या विद्यार्थ्याचे नाव आहे, त्या शाळेत या विद्यार्थ्याला शालेय पोषण आहारही मिळतो. दरम्यान, हे विद्यार्थी शासनाची मुख्य शाळा आणि राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाची शाळा अशा दोन्ही ठिकाणी शिक्षण घेऊन शिक्षण आणि आणि आर्थिक हातभार अशा दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊ शकतात. आज १२ जूनच्या बाल कामगार विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या बालकामगार प्रकल्पातील हलाखीची परिस्थिती असलेल्या काही गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निवडणूक उपजिल्हाधिकारी राजू नंदकर, कामगार अधिकारी टी. ई. कराड, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सतीश पंच, अण्णा सावंत, यांच्यासह रामदास जगताप यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता माटे यांनी केले.

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाची जालन्याची आजची स्थिती

जालना जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाच्या ७० शाळा आहेत. त्यापैकी ५५ शाळा जालन्यामध्ये तर उर्वरित शाळांमध्ये अंबड - २ ,मंठा -२ जाफराबाद -२, बदनापूर -एक, घनसावंगी -एक, शेवली- एक, परतूर -२, पारडगाव -एक, भोकरदन -एक, राजूर -एक आणि शहागड -एक अशी संख्या आहे. एका केंद्रासाठी ५० विद्यार्थी संख्या मंजूर आहे. त्यानुसार ७० केंद्रांच्या माध्यमातून २ हजार ७५७ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची ७० टक्के हजेरी असेल तर त्यांना दरमहा चारशे रुपये विद्यावेतन मिळते. हे विद्यावेतन केंद्र शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर परस्पर जमा केले जाते. ९ ते १४ वयोगटातील बाल कामगारांचा या प्रकल्पामध्ये प्रवेश होऊ शकतो. ही सर्व यंत्रणा चालविण्यासाठी स्वयंसेवक आणि शिक्षक असे २१० कर्मचारी, त्यांच्या मदतीसाठी ७० कर्मचारी आणि ६ कार्यालयीन कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यांचे प्रकल्प प्रमुख म्हणून मनोज देशमुख हे काम पाहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details