जालना- दुष्काळाच्या झळा फक्त माणसांनाच लागतात असं नाही. तर वन्यप्राणी देखील पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करीत आहेत. ग्रामीण भागात वानरे देखील पाण्यासाठी विहिरींचा शोध घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुष्काळाच्या झळा; पाण्यासाठी वानरे विहिरींचा शोध घेतात तेव्हा. . . . - वन्यप्राणी
पाण्याच्या शोधात वन्यप्राणी रानोमाळ भटकंती करीत आहेत. ग्रामीण भागात वानरे देखील पाण्यासाठी विहिरींचा शोध घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
परतूर तालुक्यातील बाबुलतारा तसेच जालना तालुक्यातील घोडेगाव या भागांमध्ये वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असल्यामुळे या वानरांना कुठेही जलसाठे दिसत नाहीत. खाण्यासाठीही गावात काहीच मिळत नसल्यामुळे काटेरी बाभळीची पाने खाऊन वानरे सध्या उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र पाण्यासाठी यांना रानोमाळ भटकंती करत विहिरींचा शोध घ्यावा लागत आहे.
शेतामध्ये खोदलेल्या विहिरींना पाणी जरी नसले, तरी विहीर असल्याचा अंदाज लागताच वानरे धाव घेत आहेत. ग्रामस्थांनाच दूरवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कोणीही पाण्याचा थेंब देखील वाया जाऊ देत नाही. गावातील जनावरांसाठी असलेले रांजण, हौद आणि पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वानरांना कुठेही पाणी नाही. पर्यायाने वानरे आपल्या पिलांसह पाण्याच्या शोधात भटकत आहेत. ही वानरे एवढी माणसाळली आहेत, की त्यांना कसल्याही प्रकारचे भीती वाटत नाही. त्यांच्यापासून देखील कोणाला काही त्रास नसल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.