जालना Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील हे संवाद दौऱ्यास अंबड इथून सुरुवात केली आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाच्या एकीमुळे अंतिम निर्णयापर्यंत आलाय. त्याचा जीआर काढण्यासाठी सर्व मराठा समाजातील पुरुष व महिलांनी एकत्र यावं, यासाठी 14 ऑक्टोंबर रोजी अंतरवाली सराटी इथं मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला सर्व मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.
मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून संवाद दौरा :या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी संवाद दौरा सुरू केलाय. त्या अनुषंगानं महाराष्ट्रभर गाठीभेटीचा दौरा सुरू राहणार आहे. आज 30 सप्टेंबर रोजी अंबड इथं अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हा दौरा सुरू झाला आहे. अंबड इथून घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, परतुर, मंठा, जिंतूर आणि हिंगोली असा आजचा जरांगे पाटील यांच्या दौरा आहे. 1 ऑक्टोबर रविवार रोजी हिंगोली, कळमनुरी, यवतमाळ, नांदेड, हदगाव, अर्धापूर, तामसा असा त्यांचा दोन दिवसीय दौरा असणार आहे. (Manoj Jarange Sanvad Yatra)