जालना - जालन्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काटकसर करून शासनाचा पैसा वाचवला खरा, मात्र निवडणुकीमध्ये अविरतपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. जेवणाचे कंत्राट दिलेल्या संस्थेने निवडणुकीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात पायऱ्यांवर दिलेले जेवण कर्मचाऱ्यांनी साखरेचा पाक शिरा समजून खाऊन 'गोड' मानून घेतला. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निवडणूक भत्त्यामध्येही कपात झाल्यामुळे हे कर्मचारी सध्या नाराज आहेत.
उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांची प्रतिक्रिया दिनांक २३ एप्रिलला जालना लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले. तत्पूर्वी या निवडणूक यंत्रणेमध्ये हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यासाठी बोलावण्यात आले होते. शासन निर्णयानुसार मतदान केंद्राध्यक्षाला सतराशे रुपये, त्यानंतर मतदान केंद्र अधिकारी एक-दोन-तीन यांना प्रत्येकी तेराशे रुपये, शिपायाला सहाशे रुपये पोलीस शिपायाला आठशे रुपये आणि सूक्ष्म निरीक्षकाला तेराशे रुपये भत्ता देण्यात यावा, असा शासन निर्णय आहे.
जालना जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेमध्ये काम केलेल्या केंद्र अध्यक्षांना सतराशे रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या हातात १०५० रुपये टिकवून सही घेण्यात आली. उर्वरित साडे सहाशे रुपयांचा हिशोब जिल्हा प्रशासनाला मागितल्यानंतर मिळालेली माहिती धक्कादायक होती. मिळालेल्या उत्तरांमध्ये अन्य ठिकाणी दिवसभराचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पूर्ण भत्ता दिला जातो, असे सांगण्यात आले. मात्र, जालन्यामध्ये शिफ्टमध्ये प्रशिक्षण घेतल्यामुळे पूर्ण दिवसाचा भत्ता न देता अर्ध्यात दिवसाचा भत्ता दिला आहे.
तसेच निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदान यंत्र घेऊन कर्मचारी रवाना करताना जेवण दिले होते. त्याचे ७५ रुपये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी मतदान यंत्र घेऊन आल्यानंतर परत एकदा जेवण दिले होते. त्याचे ७५ रुपये कपात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रवाना होताना दिलेले जेवण हे अनेकांनी स्वतःच्या हाताने प्लेटा धुवून घेऊन पर्याय नसल्यामुळे डोळे झाकून खाल्ले. तसेच अर्ध्या दिवसाचे प्रशिक्षण ठेवून प्रशासनाने काय साध्य केले, असा प्रश्नही हे कर्मचारी उपस्थित करीत आहेत. कारण जरी अर्धा दिवस प्रशिक्षण घेतले असले तरी जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रशिक्षणामुळे लागणारा वेळ यामुळे तो दिवस पूर्ण गेलाच. मग प्रशासनाने अर्ध्या दिवसांचा भत्ता कपात करून काय साध्य केले ?असा प्रश्नही विचारत आहेत. कर्मचाऱ्यांचे दोन वेळच्या दिलेल्या जेवणयाच्या गुणवत्तेवर न बोललेलेच बरे .
एकंदरीत या निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे झालेले हाल हे विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितच प्रशासनाला त्रासदायक ठरणारी बाब आहे .निवडणूक प्रक्रिया जरी शांततेत पार पडली असली तरी ठिकठिकाणच्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांचे पाण्यासाठी झालेले हाल, जेवणामुळे झालेले हाल, यामुळे मात्र सर्वत्र निवडणूक निर्णय अधिकारांबद्दल तीव्र नाराजी आहे. प्रत्यक्षात या सर्व प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी स्काऊट अँड गाईडचे विद्यार्थी इन्ड्स बालकामगार प्रकल्पाच्या शिक्षिका अशा विविध संस्थांच्या मदतीने ही निवडणूक पार पडली आहे.