जालना - भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांना उचकवून देण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी केला. मात्र, दानवेंच्या हे लक्षात आल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. २ तारखेला असाच प्रयत्न खोतकर यांनी केला होता. मात्र, तो फसल्यानंतर आज पुन्हा एकदा खासदारांना उचकवण्याचा प्रयत्न फसला.
आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या घटकेवेळी आज रविवारी (दि.१०) नवीन जालना आणि जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे नूतनीकरण होते. या निमित्त हे दोघेही पुन्हा एकदा मांडीला मांडी लावून बसले होते. ब्रिटिश कालीन असलेला हा पूल मोडकळीस आल्याचे पत्र इंग्रजांनी जालना नगरपालिकेला पाठवून मुदत संपल्याचेही सांगितले होते. त्या धर्तीवर १३ कोटी रुपये खर्चून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.