जालना - जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करून काँग्रेसने हरिजन, दलित, लोकांना 70 वर्षांपासून सत्तेपासून वंचित ठेवले, कारण तिथे कुठलेही आरक्षण नाही. परंतु, आता कलम 370 हटवल्यामुळे दलित, हरिजन, आदिवासी समाज लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, अशा प्रकारच्या निवडणुका लढू शकेल आणि सत्तेतही सहभागी होऊ शकेल. असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी जालन्यात व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली महाजनादेशची दुसऱ्या टप्प्यातील यात्रा बुधवारी जालन्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरचिटणीस, सुजित ठाकूर, खासदार रावसाहेब दानवे, ना. बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, तीन तलाक हा विषय सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही काँग्रेस मानायला तयार नव्हती, कारण त्यांनी याच मुद्यावर मतांचे राजकारण केले आहे. समाजातील विकृतींविरुद्ध लढणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.