जालना - नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नगरपालिकेची मालमत्ता असलेल्या समाज मंदिरे आणि शौचालयाची ठिकाणे हातभट्ट्यांसाठी वापरल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या हातभट्ट्या दोन दिवसानंतर पुन्हा जैसे थे होत असल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मात्र, या प्रकाराबद्दल नगरपालिकेला काहीही सोयरसुतक नाही आणि जोपर्यंत यांचे हे उद्योग बंद होत नाहीत तोपर्यंत आपण वारंवार छापे टाकून या हातभट्ट्या उद्ध्वस्त करू असा विडा कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी उचलला आहे.
नगरपालिकेच्या समाज मंदिर आणि शौचालयांचा हातभट्ट्यांसाठी वापर - जालना पोलीस बातमी
आठ दिवसांपूर्वीच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सीआरपी तसेच नगरपालिका कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने या सर्व हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या.
कुंडलिका नदीच्या काठावर नगरपालिकेचे शौचालय आणि समाज मंदिर आहे. हा परिसर नदीचा काठ असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात बाभळीचे जंगल वाढले आहे. याचा गैरफायदा घेत येथील समाज मंदिरांवर आणि शौचालयावर हातभट्टी तयार करणाऱ्यांनी ताबा मिळविला आहे. आठ दिवसांपूर्वीच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सीआरपी तसेच नगरपालिका कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने या सर्व हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. तसेच बाभळीचे जंगलही तोडून साफ केले होते. मात्र, आठ दिवसांनंतर तिथे पुन्हा हातभट्ट्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत.
यासंदर्भात पोलीस प्रशासनाने पालिका प्रशासनाशी संपर्क साधला. लेखी पत्रव्यवहारही केला. मात्र अद्यापपर्यंत काहीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनीदेखील ही जागा पालिकेची आहे आणि तिथे आपण वृक्षारोपण करू असे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र अजून पालिकेने कोणतीच पावले उचललेली नाहीत. परंतु जोपर्यंत पालिका ही जागा ताब्यात घेऊन तिचे योग्य नियोजन करत नाही तोपर्यंत येथील हातभट्ट्या बंद होण्याचे चिन्हे नाहीत.