जालना -माजी आमदार तथा विद्यमान नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचे पती कैलास गोरंट्याल हे टक्केवारी सम्राट आहेत. प्रत्येक कामामध्ये त्यांची टक्केवारी ठरलेले आहे. त्यामुळेच जालना नगरपरिषदेमध्ये अवैध कामे वाढली आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शेळके यांनी केला आहे. पालिकेच्या कारभाराची लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेळके यांनी आज (दि.१७) पत्रकार परिषदेत केली.
शेळके यांनी यासंदर्भात शासनाच्या सर्व तपासणी कार्यालयांना पत्रदेखील पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नगराध्यक्षांच्या नावाखाली येणारा निधी दुसऱ्या कारणांसाठी मनमानी पद्धतीने आणि स्थायी समितीची परवानगी न घेता वापरला जातो. याशिवाय, सन 2018 गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी पालिकेने विसर्जन स्थळी कुठलीही सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे तीन गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगराध्यक्षांना दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पालिकेची जन्म-मृत्यूची नोंद सुरळीत करण्यात यावी. पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात यावे, अशा विविध मागण्या शेळके यांनी यावेळी केल्या.