जालना - जिल्हा परिषदे अंतर्गत बांधकाम उपविभाग जाफराबाद येथे यु. बी. ओव्हळ ही व्यक्ती उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. 2 जुलै 2018 रोजी या अभियंत्याची औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या कन्नड उप विभागातून जालन्याला बदली झाली.
अभियंता आला; रुजू ही झाला, मात्र त्यांच्यासोबत येणारे दप्तर अजूनही आलेच नाही. त्यामुळे या अभियंत्याचे काम चालू आहे. मात्र, दीड वर्षापासून पगार झालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संबंधित कर्मचारी 'बिन पगारी, फुल अधिकारी' आहे.
यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेने औरंगाबाद जिल्हा परिषदेची पत्रव्यवहारही केला आहे. संबंधित प्रकरणी 6 मार्च 2019 ला औरंगाबाद जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मुळ सेवा पुस्तिका मागवण्यात आली आहे.
मात्र, अभियंता ओव्हाळ यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेतील चौकशी आणि वसूली सुरू असल्यामुळे दप्तरच बदली झालेल्या ठिकाणी आलेच नाही. शासन निर्णयाप्रमाणे मुळ सेवा पुस्तिका आणि अंतिम वेतन प्राप्त झाल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याचे वेतनही काढता येत नाही.