जालना- शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पारा ४३.२ अंशावर पोहोचला आहे. या मोसमातील सर्वात जास्त तापमान आज नोंदविले गेले. शुक्रवारी हे तापमान ४३.१ नोंदवले गेले होते होते. आज वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनी सकाळी १० वाजण्यापूर्वीच बाहेरील कामे करण्याला प्राध्यान दिल्याचे दृश्य शहरात दिसत होते. मात्र, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भर उन्हामध्ये आपले कर्तव्य निभावल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.
उद्या रविवारी लग्नतिथी आहे, त्यातच सुट्टीचा दिवस असल्यामुळे नागरिकांच्या मनात नसतानाही घराच्या बाहेर पडावे लागले. त्यामुळे एवढ्या तापमानातही शहरांमध्ये तुरळक वाहतूक होती. मात्र, या वाहतुकीशी सबंध असलेल्या आणि लग्नाच्या मुहूर्ताची काही देणेघेणे नसले तरी आपले कर्तव्य निभावणे हा एकमेव उद्देश असलेल्या शहर वाहतूक पोलिसांसाठी मात्र उन्हाळा जीवघेणा ठरत आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांवर शहर वाहतूक पोलिसांसाठी निवारा केलेला आहे. मात्र, या निवाऱ्यावरील छतच बाजूला काढून टाकले असल्यामुळे हे निवारा अडचण ठरत आहे. त्यामुळे भर उन्हामध्ये शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना डोक्यावर टोपी आणि कानाला रुमाल बांधून आपले कर्तव्य निभवावे लागत आहे. या सर्व दृश्यावरून दुसऱ्यांना सुरक्षिततेसाठी काळजी घेणाऱ्या या शहर वाहतूक पोलिसांची प्रशासनकडून मात्र काळजी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.