जालना- बदनापूर तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दूरावस्था झाली आहे. यावर लाखो रुपये खर्च केले जात असूनही रस्त्यांच्या कामात प्रचंड घोळ दिसून येत आहे. अशीच अवस्था देवगाव फाटा ते माळेगाव दरम्यान होत असलेल्या रस्त्याची झाली आहे. या रस्ताच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे हा रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. या रस्ता कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी होत आहे.
देवगाव-माळेगाव रस्त्याचे दृश्य बदनापूर तालुक्यातील देवगाव फाटा ते माळेगाव दरम्यान कुसळी मार्गे रस्ता आहे. या रस्त्याची अतिशय दूरावस्था झाल्यामुळे त्याचे मजबुतीकरण व खडीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामात प्रचंड अनियमितता दिसून येत असून खडीकरण करण्यासाठी वापरण्यात येत असलेली खडी ही माती मिश्रित असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर, रस्त्यासाठी टाकण्यात येत असलेल्या खडीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक मातीचे प्रमाण दिसून आले. असे असतानाच रस्त्याच्या बाजूलाच चारी करून त्यातून काढण्यात आलेला मातीवजा मुरूम या ठिकाणी रस्ता कामात वापरण्यात येत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू असताना स्थानिक प्रशासन मात्र कोणत्या दबावाखाली या कामाकडे दुर्लक्ष करत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकरणाकडे स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कानडोळा
या रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊन तपासण्याची गरज आहे. मात्र, स्थानिक प्रशासकीय अधिकारी याकडे कानडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निकृष्ठ बांधकाम साहित्याचा वापर करून जर हा रस्ता तयार करण्यात आला तर, या रस्त्याचे आयुष्य जास्त राहणार नसून एक ते दीड वर्षात हा रस्ता पुन्हा खड्डेमय होण्याची शक्यता या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी नवीन असून मी या प्रकरणाबाबत माहिती घेत आहे. माहिती मिळाल्यानंतर कारवाई करतो, असे सांगून त्यांनी विषय संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाने गंभीरतेने बघण्याची गरज असल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. देवगाव फाटा ते माळेगावपर्यंत जवळपास ७ ते ८ गावांना जोडून हा रस्ता बदनापूर व औरंगाबाद तालुक्यांना जुळतो. त्यामुळे, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अशा परिस्थितीत हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्यास त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नसल्याचेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-पैठणजवळ जलवाहिनी फुटल्याने जालन्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम