जालना - औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे सोमवार 28 ते 30 डिसेंबरपर्यंत तीन दिवस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पोलीस यंत्रणेसाठी हा दौरा महत्त्वाचा असतो. त्यामध्ये पोलिसांची दप्तर तपासणी, गुन्ह्याचा आढावा घेणे, पोलिसांना शाबासकी देणे आणि त्यासोबत कामचुकार पोलिसांना घराची वाट दाखवणे हादेखील महत्त्वाचा कार्यक्रम पार पाडला जातो.
सुरुवात चंदनजिरा पोलीस ठाण्यापासून -
सोमवारी सकाळी दहा वाजता जालना शहरातील आणि जालना रोडवर असलेल्या चंदनजिरा पोलीस ठाण्यात त्यांचे आगमन होणार आहे. इथूनच त्यांच्या जालना जिल्ह्याच्या तपासणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अद्यावत करणे चालू आहे. शहर हद्दीत असलेल्या चारही पोलीस ठाण्यांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी कदीम जालना आणि तालुका पोलीस ठाणे हे आत्ताच स्थलांतरित झाल्यामुळे तिथे फारशी दुरुस्तीची गरज नाही. मात्र, चंदंनजिरा आणि सदर बाजार हे दोन्ही पोलीस ठाणे जुन्या इमारती असल्यामुळे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. चंदनजिरा पोलीस ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर आहे. त्यामुळे तिथे भव्य पटांगण आहे. वर्षानुवर्ष अस्ताव्यस्त पडलेली वाहने, जप्त केलेली वाहने, भंगार गाड्या आणि छोटीशी इमारत त्यामुळे या इमारतीत बसणे हे अवघड झाले होते. मात्र, आता स्वच्छता आणि रंगरंगोटी केल्यामुळे ही सुंदर आणि देखणी इमारत पोलिसांच्या कार्यक्षमतेमध्ये निश्चितच भर टाकणारी आहे.