जालना- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आजपासून जालना औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचा महत्त्वाचा भाग असलेली स्टील इंडस्ट्री ही कदाचित शनिवारी सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, परवानगी दिल्यानंतर आज बहुतांशी कंपनी मालकांनी औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन आपापल्या कारखान्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
काही कंपनी मालकांशी बोलल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे कामगारांची आहे. स्टील उद्योगांमध्ये काम करणारे बहुतांशी कामगार हे परप्रांतीय होते, ते प्रचंड मेहनत करणारे कामगार होते. मात्र, हे कामगार आपल्या गावी परतल्यामुळे कामगारांचाही मोठा प्रश्न कंपनी समोर आहे. तो प्रश्न सोडविल्यानंतर कंपनीमधील उत्पादन झालेला माल हा विकायचा कुठे? हा दुसरा प्रश्न आहे. कारण, ज्यांच्या माध्यमातून हा माल विकला जातो, तिच दुकाने अजून सुरू झालेली नाहीत. त्याचबरोबर, जोपर्यंत बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत स्टील उत्पादन करून उपयोग नाही. कारण, दुकानांच्या माध्यमातून हे स्टील विकल्या गेले पाहिजे आणि पहिला साठा संपल्यानंतर दुकानदारांनी दुसऱ्या स्टीलची मागणी केली पाहिजे.