जालना -कदीम पोलिसांनी 15 दिवसात दुसऱ्यांदा मोठी कारवाई करत कुंडलिका नदीच्या काठावर आणि कैकाडी मोहल्ला भागात असलेल्या देशी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सुबाभूळ या झाडाच्या आडून या धंद्याला वाव मिळत होता. त्यामुळे या परिसरातील ही बाभळीचे झाडेदेखील जेसीबीच्या साहाय्याने उपटून टाकण्यात आली आहेत. कदिम जालना पोलीस आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
जेसीबीच्या साहाय्याने हातभट्ट्या उद्ध्वस्त; जमिनीचेही सपाटीकरण - country liquor in jalna
जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून एक जेसीबीदेखील उपलब्ध करून घेण्यात आला. नगरपालिकेचे कर्मचारी, काही कमांडो आणि पोलीस प्रशासनातील कर्मचारी अशा सर्वांनी मिळून या परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
आज शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि त्यांचे सहकारी कैकाडी मोहल्ल्यात पोहोचले. तत्पूर्वी जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून एक जेसीबीदेखील उपलब्ध करून घेण्यात आला. नगरपालिकेचे कर्मचारी, काही कमांडो आणि पोलीस प्रशासनातील कर्मचारी अशा सर्वांनी मिळून या परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच याच पोलिसांनी अशाचप्रकारे येथे कारवाई केलेली होती. मात्र, पुन्हा हातभट्ट्या पूर्ववत सुरू झाल्या. त्यामुळे आज ज्या सुबाभूळचा आडोसा घेऊन या हातभट्ट्या सुरू आहेत ती झाडेच जेसीबीने उखडून टाकली आहेत.
दुपारी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. जालना नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शौचालय आणि सभागृहांमध्ये या हातभट्ट्या सुरू होत्या. दरम्यान, ही कारवाई करण्यासाठी ज्या भागातून जावे लागते तो भाग अरुंद असल्यामुळे हातभट्टीपर्यंत पोलीस पोहोचण्यापूर्वीच दारू उत्पादकांना याची माहिती मिळते आणि सर्वजण पसार होतात. त्यामुळे आज कोणालाही आरोपी म्हणून ताब्यात घेतले नाही. परंतु ही कारवाई अशीच चालू राहील आणि आणि इथे पूर्ण सपाटीकरण करून जागा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येईल. पालिकेने तिथे वृक्षारोपण करावे, अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी व्यक्त केली आहे.