जालना - समृद्धी महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी घाणेवाडी जलाशयातून हजारो ब्रास मुरूम उपसला जात आहे. त्यामुळे या तलावात पंधरा ते वीस फूट खोल खड्डे तयार झाले आहेत. यामुळे घाणेवाडी जलाशयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मुरमाच्या मनमानी उपशामुळे घाणेवाडी जलाशयाला धोका
शुक्रवार दिनांक 28 ला जलतज्ञ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी आणि घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी या जलाशयाची संयुक्त पाहणी केली. यावेळी तलावाच्या भिंती पासून एकदम वरच्या तोंडाला हे खड्डे खोदल्यामुळे वरून वाहत येणारे पाणी तलावापर्यंत पोहोचणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या तलावाच्या दोन्ही बाजूला सांडवे आहेत. जेणेकरून तलाव पूर्ण भरल्यानंतर जास्तीचे पाणी दोन्ही बाजूने वाहून जाईल. सांडव्याच्या जवळच मुरूम उपसा केल्यामुळे पाण्याच्या दबाव सांडव्याच्या भिंतीवर येऊन या भिंती वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. जर असे झाले तर तलावांमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक राहणार नाही, अशी माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून नगरपालिकेनेच एनओसी दिली असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र नगरपालिकेने वरिष्ठ प्रशासनाच्या आलेल्या पत्रामुळे मुरूम उपसण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु हा मुरूम कुठून उपसायचा किती उपसायचा याविषयीचे मार्गदर्शन गौण खनिज अधिकाऱ्यांनी करायला हवे. मात्र तसे न होता, समृद्धी महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्याला जसा सोयीस्कर पडेल तसा मुरूम उपसण्याचा सपाटा लावला आहे.