जालना- मुलगा दारूसाठी पैसे देईना, मारहाण करून भांडणे करत असल्याच्या रागातून बापानेच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे घडली. संतोष कुरधने असे त्या खून झालेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. खूनाचीही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ सुत्रे फिरवून आरोपी बापाला अटक केली आहे. हनुमान कुरधने असे त्या खुनी बापाचे नाव आहे.
जालना तालुक्यातील नंदापूर येथील मूळचे राहणारे हनुमान कुरधने हे काही वर्षांपूर्वी आपली उपजीविका भागवण्यासाठी रामखेडा येथे स्थायिक झाले होते. घटनेच्या दिवशी (बुधवारी १५) त्यांच्या शेजारचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यामुळे आरोपी हनुमान कुरधने हे पत्नी आणि मुलीसोबत शेजारच्या घरावर झोपायला गेले होते. मात्र, पहाटे त्यांची मुलगी जेव्हा घरात आली, त्यावेळी तिला संतोषचा खून झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिने आरडाओरडा करून आई-वडिलांना खाली बोलावले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी खुनाची केस दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. मात्र, पोलिसांना या खुनाचे धागेदोरे सापडत नव्हते. त्यामुळे पोलीसदेखील चक्रावून गेले होते. दरम्यान पोलिसांनी तब्बल १६ साक्षीदारांची चौकशी केली. त्यातील एका साक्षीदारांच्या आणि हनुमान कुरधने याच्या बोलण्यातील तफावत लक्षात आली. त्यामुळे पोलिसांनी हनुमानला ताब्यात घेतले आणि विचारपूस करयला सुरुवात केली. त्यावेळी कुरधने हा वारंवार जवाब बदलत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन हकीकत विचारली असता, त्यानेच संतोषचा खून केला असल्याची कबुली दिली आहे.