जालना- लग्नाच्या नावाखाली फसवणुकी करणाऱ्या टोळीचे बिंग फुटले. टेंभुर्णी पोलिसांनी दोन एजंट व चार वधूंना जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ गावात बेड्या ठोकल्या. सातेफळ गावातील एका शेतात काही लोक संशयितरित्या जमा झाल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती. पोलीस शेतात दाखल होताच काही लोकांनी त्याठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसानी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.
एकच वधू दोघांना पसंत आल्याने फुटले बिंग! लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
टेंभुर्णी पोलिसांनी दोन एजंट व चार वधूंना जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ गावात बेड्या ठोकल्या. सातेफळ गावातील एका शेतात काही लोक संशयितरित्या जमा झाल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती. पोलीस शेतात दाखल होताच काही लोकांनी त्याठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसानी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.
सविता माळ या महिलेने औरंगाबाद येथील काही मुलींना लग्नासाठी तयार केले. जळगाव जिल्ह्यातील भडगाव व फुलंब्री येथील लग्नास इच्छुक असणाऱ्या दोन युवकांना लग्न लावून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी दोन लाख रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार लग्नासाठी दोघांच्याही कुटुंबाना बोलावून घेतले. मात्र एकाच वेळी दोन्ही वर पक्ष समोरा-समोर आले. दोन्ही पक्षाला एकच वधू पसंत पडली. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
टेंभुर्णी पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत सविता राधाकिसन माळी, अनिल राधाकिसन माळी, अनिल जगन्नाथ बनकर या एजंटसह सुनिता बाळू माळी, सुषमा सुभाष बेळगे, शिला मनोहर बनकर, शितल बाबुराव निकम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता अनेक मुला-मुलींचे बायोडाटा आणि फोटो आढळून आल्याने या टोळीने धुळे, औरंगाबाद, जळगाव, परभणी, नांदेड या शहरात अनेक लग्नास इच्छुक असलेल्या तरुणांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी सविता माळी ही फरार झाली असून टेंभुर्णी पोलीस तिचा शोध घेत आहे.