जालना- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले. या टप्प्यात जालना मतदारसंघातही मतदान झाले. येथील उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांची यामधून सुटका झालेली नाही. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व ईव्हीएम मशीन एकत्र करून सुरक्षा कक्षात सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या सर्व ईव्हीएम मशीन जालना-औरंगाबाद रस्त्यावरील संकेत फूड प्रॉडक्ट या बंद पडलेल्या कंपनीच्या गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी दिनांक २३ मे'ला मतमोजणी होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, भोकरदन, बदनापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या ६ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन मंगळवारीच जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासूनच जमा झालेल्या मशीन सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि मतमोजणी सुरळीत पार पडावी या उद्देशाने संकेत फूड प्रॉडक्ट्सच्या गोदामात सुरक्षितरित्या सील बंद करण्यात आल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात होता.