जालना - लाच प्रकरणी न्यायालयाने आज (24 मे) पोलीस उपाधीक्षकासह तिन्ही आरोपींना जामीन दिला. शनिवारी सुनावणी झाल्यानंतर आरोपींना दोन दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, आरोपी पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सुरूवातीला जालना आणि नंतर औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
सोशल मीडियावर तीव्र विरोध
दुसरीकडे, सोशल मीडियावर सुधीर खिरडकर यांच्या विरोधात वातावरण तापू लागले आहे. विविध संघटनांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईबाबतचे निवेदन दिले आहे. आज आरोपींना न्यायालयात आणत असताना संघटनांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचीही तयारी केली होती. त्यामुळे आरोपींना न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती खाजा यांनी तीनही आरोपींना जामीन मंजूर केला.
काय आहे प्रकरण?
जालना तालुक्यातील कडवंची येथील सुरेश दगडुबा क्षीरसागर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यात पोलीस उपाधीक्षक सुधीर अशोक खिरडकर, पोलीस नाईक संतोष अंभोरे आणि पोलीस शिपाई विठ्ठल खारडे यांची नावे आहेत. 'आरोपींनी क्षीरसागर यांच्यावर दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 3 लाख रुपये देण्याचे ठरले', अशी तक्रार आहे. दरम्यान, त्यापैकी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना संतोष अंभोरेंना रंगेहात पकडले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून अन्य दोघेदेखील यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावरही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
21 मे रोजी गुन्हा दाखल