बदनापूर (जालना)-बदनापूर शहराची झपाटयाने वाढ होत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे व मध्यवस्तीतून जालना-औरंगाबाद महामार्ग गेलेला असल्यामुळे, शहर परिसरात मोठ्या संख्येने कापसाच्या जिनिंग आहेत. त्यामुळे आग लागणे अथवा तेल-गॅस गळतीचे प्रकार होऊन अपघात होत असतात. मात्र यासाठी बदनापूर नगर पंचायतकडे अग्नीशमन दलाची गाडी नसल्यामुळे या ठिकाणी जालना किंवा औरंगाबाद येथून अग्नीशमन दलाला पाचारण करावे लागते. यासाठी नागरिकांनी बदनापूर येथे अग्नीशमन दलाच्या गाडीची मागणी केली आहे.
मोठया ग्रामपंचायतींना अग्नीशमन दलाची स्थापना करण्याचे शासनाचे निर्देश
अग्निशमन दल हा महापालिका अथवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्त्वाचा असा विभाग समजला जातो. वारंवार घडणार्या आपत्तीच्या आणि आगीच्या घटना लक्षात घेऊन मोठ्या ग्रामपंचायतींनीही अग्निशमन दलाची स्थापना करावी, असे आदेश राज्य शासनाने अनेक वर्षांपूर्वी दिले आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सुविधा पुरविण्यात येतील, असा शब्द तत्कालीन सरकारने दिला होता. यासंर्भात अभ्यास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने गेल्या चार वर्षांत या प्रस्तावावर कोणतीही प्रभावी कामगिरी न केल्याने हा प्रस्ताव मंत्रालयातच धूळखात पडून आहे. त्यामुळे मोठया ग्रामपंचायत तर सोडा बदनारपूर सारख्या नगर पंचायत असलेल्या शहरातही अद्याप अग्नीशमन दल स्थापन होऊ शकलेले नाही.
दाट लोकवस्तीमुळे अग्नीशमन दलाची आवश्यकता
जेथे जीवित व वित्तहानी होऊ शकते व आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी अग्निशामक दलाची मदत घेता येते . उदा. आग दुर्घटना घडल्यास, घरगुती गॅस सिलिंडरमधून (LPG) गॅसगळती झाल्यास, वायु गळती झाल्यास, व्यक्ती पाण्यात बुडाल्यास, पाण्यात अडकल्यास, वादळ- वा-याने झाड पडल्यास किंवा त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास, झाड धोकादायक असल्यास, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन विभागाच्या सेवा वापरता येतात. बदनापूर शहरातून मुख्य महामार्ग गेलेला असून, दुतर्फा निवासस्थाने आहेत तसेच शहराच्या आजूबाजूंना जिनिंग प्रेसिंग असल्यामुळे या ठिकाणीही आगी लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात अशावेळी जालना किंवा औरंगाबादहून अग्नीशमन दलाला पाचारण करावे लागते.
अग्नीशमन दल स्थापन करण्याची जिनिंग व्यवसायिकांची मागणी
बदनापूर शहराच्या आजूबाजूला तीन ते चार जिनिंग असून या ठिकाणी कापूस खरेदी होते. यासाठी तालुक्यातून मोठया संख्येने वाहने येथे जमा होतात व मोठया प्रमाणात कापसाची आवक होते. जिनिंग व्यवसायिकांकडून आग लागू नये यासाठी काजळी घेण्यात येते. आगनिरोधक यंत्रणा देखील या व्यवसायिकांनी बसवलेली आहे. मात्र तरीदेखील आग लागल्यास औरंगाबाद किंवा जालन्यावरून अग्निशमन दलाला बोलावण्यात येते. अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत मोठे नुकसान होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन दल स्थापन करावे अशी मागणी जिनिंग व्यवसायिकांनी केली आहे.
बदनापूरमध्ये अग्निशमन दल स्थापन करण्याची मागणी