जालना :ऋषीकेश शेषराव काळे (रा. जुना जालना, ता. जि. जालना) यांच्या फियादीवरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अद्यापपर्यंत ११६ लोकांची एकूण २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुन्हा तांत्रिक दृष्टया अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपींचे शोधकाम सुरू करण्यात आले. गुन्हयात वापरण्यात आलेली बनावट वेबसाईट बनवून त्याचा गैरवापर होत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यातील वेबसाईट वापरणारे आरोपी हे पुणे आणि इचलकरंजी (ता. जि. कोल्हापूर), महाराष्ट्र, गुजरात राज्यातील असल्याची खात्री झाली. यानंतर माहितीच्या आधारे २ तपास पथके पुणे येथे रवाना करण्यात आले होते. या तपास पथकाने आरोपी गुन्हा करत असलेल्या ठिकाणी छापा टाकून वेगवेगळया ठिकाणाहून ०४ इसमांना ताब्यात घेतले. आरोपीच्या घराची झडती घेऊन चौकशी केली असता गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले.
4 आरोपींना अटक : झडती दरम्यान आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेले ०३ लॅपटॉप, ०३ संगणक आणि ०९ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींची फसवणूक केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेल्या महागड्या गाड्या (चारचाकी वाहने) जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तुंची अंदाजे किं. २,४४,००,०००/- आहे. गुन्हयात आरोपींच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विविध बँक खात्यामध्ये एकूण ३,४४,००,०००/- रुपये गोठविण्यात आले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये ०४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.