जालना - कर्तव्यापुढे वात्सल्यावर पाणी सोडत आणि काळजावर दगड ठेवत दीड वर्षाच्या मुलीला झोपेत सोडून अनुजा अशोकराव दानी-कुलकर्णी ही परिचारिका सध्या जालना येथील कोरोनाच्या रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहे. विशेष म्हणजे यांचे पती देखील औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कर्मचारी आहेत. त्यामुळे दोघांनाही अत्यावश्यक सेवेसाठी हजर व्हावे लागले आणि आपल्या दीड वर्षाच्या मुलीला आजी-आजोबांकडे सोडावे लागले.
अनुजा दानी यांचे लग्न बुलढाणा येथील कल्पेश कुलकर्णी यांच्याशी झाले. दीड वर्षापूर्वी त्यांना मुलगी झाली आणि अवनी नाव ठेवले. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्यामुळे मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्यांनी जालना निवडले आणि अनुजा यांचे पती कल्पेश हे जालना-औरंगाबाद वेळेनुसार जाणे-येणे करायला लागले. दरम्यानच्या काळात हे दोघेही गुढीपाडव्यासाठी बुलढाणा येथे गेले आणि कोरोनामुळे टाळेबंदी सुरू झाली. अशा परिस्थितीमध्ये मुलीला इकडे आणायचे कसे? आणि अशा अत्यावश्यक सेवेच्या दिवसात या मुलीचा सांभाळ कोण करणार? हा मोठा यक्ष प्रश्न या दाम्पत्या समोर उभा राहिला. शेवटी मुलीला आजी-आजोबांकडे सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुपारच्या वेळी दीड वर्षाची मुलगी गाढ झोपेत असताना या दोघांनी काळजावर दगड ठेवत बुलढाणा सोडले.