मुंबई -हुतात्म्यांना अतिरेकी म्हणणारा, साले म्हणून अन्नदात्याचा अवमान करणारा दानवच असू शकतो मानव नाही. अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. तसेच भाजपला काही लाज असेल तर त्यांनी तात्काळ दानवेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
हुतात्म्यांना अतिरेकी म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंची तात्काळ हकालपट्टी करा - काँग्रेस - Congress
भाजपला काही लाज असेल तर त्यांनी तात्काळ दानवेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंतयांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, सैनिकांचा अवमान करण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. नरेंद्र मोदी यांनी सैनिकांपेक्षा जास्त धोका व्यापारी पत्करतात, असे बोलून सैनिकांचा अवमान केला होता. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी तर अश्लाघ्यपणाचा कळस गाठून सैनिकांबाबत अत्यंत हीन वक्तव्य केलेहोते. याचा जाहीर निषेध काँग्रेस पक्षाने पूर्वीही केल्याचे सावंत यांनी सांगितले.
रावसाहेबांचे व्यक्तिमत्व भाजपच्या दानव संस्कृतीला साजेशे आहे. या अगोदरही त्यांनी निवडणुकीत लक्ष्मी दर्शन करण्याकरिता मतदारांना आवाहन केले होते. तसेच तुम्ही मला मते द्या, मी तुम्हाला पैसे देतो असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. भाजपात अशा दानव विचारधारेच्या लोकांचा सुकाळ असून या दानव भाजपचा राजकीय अंत देशातील जनताच करेल असा विश्वास काँग्रेस प्रवक्त्यांनी व्यक्त केला.