जालना - बदनापूर तालुक्यातील अवघ्या 70 उंबरठ्याचे छोटेसे गाव असलेल्या पाडळी येथील महिला स्वयं रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहेत. या महिला मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक साधनांचा वापर करून होळीसाठी रंगांची निर्मिती करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या गाठीशी दोन पैसे जमा होत आहेत. छोट्या उद्योगापासून मोठा उद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा...रडत बसण्यापेक्षा लढणार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली दहावीची परीक्षा...!
दुधना नदीच्या काठी असलेले पाडळी गाव उपक्रमशील आहे. गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला आहे. शिवाय पाणंदमुक्त गाव अशी पाडळीची ओळख आहे. गावनजिकच्या दुधना नदीचे लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खोलीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
पाडळी येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीवर भर देत आहेत. ग्रामविकास समिती ( रा. स्व. संघ) माध्यमातून नैसर्गिक कच्चा माल घेऊन होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती केली जात आहे. यासाठी गटाच्या प्रमुख सुनीता दत्तात्रय सिरसाट यांच्या पुढाकाराने महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. मागच्या वर्षी या गटाने होळीच्या नैसर्गिक रंगाची निर्मिती केली होती त्यास बाजारात मोठी मागणी होती. शिवाय दिवाळीच्या वेळेस नैसर्गिक साधनांचा वापर करून सुगंधित उटणेही तयार केले होते. एकूणच महिलांना उद्योगातून उत्पन्न मिळत असल्याने गावातील इतर महिलाही स्वयंरोजगारासाठी पुढाकार घेत आहेत.